सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिलं विमान उतरुन काही तासही झालेले नाहीत, तोवर यावरुन राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे. “नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे, त्यात मीठ कशाला कालवता”, असा सवाल सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना केला आहे.

कोकणातील चिपी विमातळावर विमानच्या लँडिंगवरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. चिपी विमानतळावरील चाचणी अनधिकृत असल्याचा आरोप राणेंनी केला होता. या टीकेला उत्तर देताना केसरकरांनी राणेंवर निशाणा साधला.

चिपी विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं!

यंदाचा गणेशोत्सव कोकणवासियांसाठी भरभराटीचा ठरला आहे. याचं कारण गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर कोकणवासियांच्या पंखांना बळ मिळालं आहे. कोकणातल्या तारकर्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिपी विमानतळावर अखेर पहिलं विमान उतरलं. आज सकाळी 11.50 च्या सुमारास या विमानानं लाल मातीत उभारलेल्या चकचकीत विमानतळाच्या इमारतीसमोर लँडिग केलं.

चेन्नईहून सकाळी हे विमान झेपावलं होतं, त्यानंतर गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर विमान चिपी विमानतळावर उतरलं. दरम्यान ही विमानाची चाचणी पाहण्यासाठी सिंधुदुर्गवासियांनी चिपी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. तरी या विमानानं बाप्पाच्या मूर्तींसह विमानतळावर हजेरी लावल्याची माहिती आहे.

नारायण राणेंचा आरोप काय?

विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. “चिपी विमानतळावर केलेली चाचणी अनधिकृत आहे. पालकमंञी दीपक केसरकर यांनी खासगी कंपनीला 10 लाख रुपये देऊन चुकीच्या पद्धतीने चिपीत विमान उतरवले. शासनाच्या परवानग्या नसताना स्वतःच्या अट्टाहासामुळे अनधिकृतपणे विमान उतरवले.” असा आरोप करत राणे पुढे म्हणाले, “शासनाच्या नियमाप्रमाणे  विमान उतरवल्यास मी स्वतः न बोलवताही गेलो असतो.”

केसरकरांचं राणेंना उत्तर

नारायण राणेंना खाजवून खरुज काढण्याची सवय आहे, “दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आले पाहिजे. त्यात मीठ कशाला कालवता?, असा सवाल दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना केला आहे.

“या विमानतळासाठी जेव्हा जमिनी घेतल्या गेल्या, तेव्हा कवडीमोलाने गोरगरिबांच्या जमिनी कोणी घेतल्या? या विमानतळाला खडी सप्लाय कोणी केला? याचा शोध घ्या. हे सगळं राणेंच्या लोकांनीच केलं.”, असा आरोपही केसरकर यांनी केला.

विमानतळ माझं स्वप्न आहे, असं राणे म्हणतात, मग गेल्या 19 वर्षात ते ते स्वप्न पूर्ण का करु शकले नाहीत? असा सवालही केसरकरांनी केला. तसेच, राणेंमध्ये स्वप्न पूर्ण करण्याची ताकद नाही, असेही केसरकर म्हणाले.

“चिपी विमानतळ हा खासगी कंपनीचा आहे. ते त्यांना हवा तेव्हा टेस्ट लँडिंग करु शकतात. त्यात एवढं राणेंच्या पोटात दुखण्यासारखं काय होत?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.