23 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पती जावेदचा व्हाट्सअॅपवर एक मेसेज आला. तो मेसेज वाचून शबाना पुरती हादरून गेली. व्हाट्सअॅप मेसेज तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा होता. पतीने चक्क व्हाट्सअॅपवरुन तिला ट्रिपल तलाक दिला होता.
ट्रिपल तलाक देण्याचं कारण ऐकून तुम्हाला या पतीचा संताप येईल. “तुला पाच बहिणी आहेत आणि तुलाही पहिली मुलगीच झाली आहे,” असं म्हणत या पतीने थेट व्हॉट्सअॅपवरुन ट्रिपल तलाक दिला.
शबाना सध्या ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत आहे. मूळची चाळीसगावची असलेली शबानाचं लग्न दोन वर्षांपूर्वी औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात राहणाऱ्या जावेद पठाण याच्याशी झालं. लग्नाच्या दीड वर्षानंतर एक मुलगी झाली. त्यानंतरच जावेद शबानाला त्रास देऊ लागला. एक दिवस त्याने शबानाला माहेरी सोडलं आणि काही दिवसातच व्हाट्सअॅपवर तलाक दिला.
पोलिसांनी नव्या कायद्यानुसार जावेद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जावेद हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
20 वर्षीय शबाना आज आपल्या एका वर्षाच्या मुलीसह आई-वडिलांकडे राहते. एका मेसेजने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. हे असले तलाक रोखण्यासाठी केंद्राने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधेयक तयार केलं आहे. लोकसभेत पास झालेलं हे विधेयक सध्या राज्यसभेत लटकलंय. पण केंद्र सरकारने नुकताच यासाठी एक अध्यादेश काढलाय. या नव्या अध्यादेशानुसार राज्यातला हा पहिला गुन्हा ठरलाय. नव्या कायद्यानुसार अशा प्रकरणात तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
संबंधित बातमी :