कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कॅन्सरचं सर्वाधिक प्रमाण असल्याच्या बातम्या आल्या आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं होतं. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि शिरोळ तालुक्यांत कॅन्सर नोंदणी केंद्र (कॅन्सर रजिस्ट्री) सुरू करण्यास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे नोंदणी केंद्र पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र असून या केंद्रात नोंदवलेल्या रुग्णांवर मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रभावी उपचार केले जाणार आहेत.

ही केंद्रे सुरू करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या केंद्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कॅन्सर रुग्णांची नेमकी संख्या काय आहे हे समजायला मदत होणार आहे.

शिरोळ तालुक्यात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं होतं. यासंदर्भात या तालुक्यात कॅन्सर का होत आहे याची कारणंही मांडली होती. लोकप्रतिनिधींच्या तक्रारींच्या आधारे उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी टाटा ट्रस्टच्या विश्‍वस्तांची बैठक घेतली होती. या बैठकीत कॅन्सर रजिस्ट्री सुरू करण्यावर चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर शासनाने बुधवारी करवीर आणि शिरोळ या दोन तालुक्यांच्या ठिकाणी कॅन्सर नोंदणी केंद्र सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जिल्ह्यातील शिरोळ, कागल, हातकणंगले व करवीर या चार तालुक्यांत कॅन्सरबाधित रुग्णांवर उपचार होण्याच्या दृष्टीने या चारही तालुक्यांत कॅन्सर रजिस्ट्री केंद्रे सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर एक सप्टेंबर रोजी डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने कॅन्सर रजिस्ट्री केंद्रे सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार करवीर आणि शिरोळ तालुक्यांत ही केंद्रे सुरू होतील. त्याच्या नियोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कार्यकारी संचालक डॉ. रेश्मा पवार यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ही समिती कोणतं काम करणार?
- कॅन्सरवरील उपचारासाठी हॉस्पिटलशी समन्वय ठेवणे,.
- रुग्णांना देण्यात येणार्‍या सुविधांवर नियंत्रण ठेवणे,.
- आवश्यक ती औषधे पुरविणे.
- केंद्राच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
- प्रत्येक तीन महिन्यांनी कामाचा आढावा घेणे
- खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोळमध्ये सर्वाधिक कॅन्सर असल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा काहींनी खोटाही ठरविला होता. मात्र कॅन्सर नोंदणी केंद्र सुरू झाल्यामुळे या तालुक्यात कॅन्सरची अचूक आकडेवारी मिळणार आहे. सोबतच कॅन्सरग्रस्त वर त्वरित उपचारही सुरू होतील. त्यामुळे कॅन्सर रजिस्टरी अर्थात कॅन्सर नोंदणी केंद्र हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक वरदान ठरणार आहे.