जळगाव : क्षुल्लक कारणावरुन जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार कण्यात आला. या हल्ल्यातून कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे. क्रिकेट खेळण्यावरुन दोन गटांत हाणामारी झाली होती. त्यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याच रागातून राजपूत गटाच्या चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने या गोळीबारात कुलभाषण पाटील हे स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी झाल्यानं, मोठा अनर्थ टळला. ही घटना कुलभूषण पाटील यांच्या राहत्या घराजवळ म्हणजेच, पिंपराला येथील मयूर कॉलनी परिसरात घडली.  


रविवारी दुपारी खोटेनगर परिसराजवळ असलेल्या मैदानावर नितीन राजपूत आणि महेंद्र राजपूत या दोघांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून जोरदार वाद उफाळून आला. हा वाद सोडवण्यासाठी दुपारच्या सुमारास उपमहापौर कुलभाषण पाटील गेले होते. त्यावेळी या दोघांतील वाद मिटविण्यास कुलभूषण पाटील यांना यश मिळालं खरं, पण पुन्हा दोन तासांनी मात्र एका इनोव्हातून आलेल्या चार जणांनी रस्त्यावरच कुलभूषण पाटील यांना अडवून भांडणात मध्यस्थी का केली? अशी विचारणा केली. तसेच कुलभूषण पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. यावेळी गाडीतील एकानं सोबत आणलेल्या बंदुकीतून  कुलभूषण यांच्यावर गोळीबार केला. मात्र नेम चुकल्याने ते बचावले. यावेळी कुलभूषण यांनी आपल्या राहत्या घराच्या मागे पळ काढून आपला बचाव केला. गाडीतून आलेल्या तिघांनी ते घरात घुसले असतील अशी शक्यता पाहता त्यांच्या घरावरही तीन राउंड फायर करून पलायन केलं, अशी माहिती प्रत्यक्ष दर्शींनी दिली आहे.  


गोळीबार करणारे हे सर्वजण उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या परिचयाचे आहेत, अशी माहिती प्रत्येक्षदर्शींनी दिली आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जळगाव शहरातील रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपूत गटात झालेल्या वादात मध्यस्थी केल्यामुळे हा हल्ला झाल्याची पोलीस सूत्रांची प्राथमिक माहिती आहे. या घटनेच्या संदर्भात अद्याप कोणालाही अटक अथवा ताब्यात घेण्यात आलेलं नसलं तरी संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली आहे.


क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला होता. तो वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. त्या ठिकाणी मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मला शिवीगाळ करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मी दुर्लक्ष करून ऑफिसला निघून गेलो, मात्र ऑफिसमधून घराकडे मोटार सायकलवरून निघालो असता, मला रस्त्यात गाठून गोळीबार केला. मी बचावासाठी घराकडे पळालो. इथेही त्यांनी गोळीबार केला. चार ते पाच जणांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहीती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली आहे.