गडचिरोली : एकीकडे कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण देश लढत असताना नक्षल्यांच्या हिंसक कारवाया थांबण्याचं नाव घेत नाही. आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत.


नक्षलविरोधी अभियानांचे सी -60 कमांडो,  भामरागड उपविभाचे QRT चे (Quick Response Team) जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कोठी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या पोयरकोठी-कोपर्शी जंगलात चकमक उडाली. हा संपूर्ण भाग छत्तीसगढ सीमेचा घनदाट जंगल भाग आहे. त्यामुळे या भागाची दुर्गमता आणि नक्षल्यांना असणारे भागाचे ज्ञान बघता काळजीपूर्वक कोंबिंग ऑपरेशन केले जात आहे. कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी भामरागड येथे हेलिकॉप्टर तैनात असून पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.


पोलीस याठिकाणी गस्त घालत असताना अचानक नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रतिउत्तरात नक्षल्याचा दिशेने गोळीबार सुरू केला. या चकमकीत गडचिरोली C-60 दलाच्या शीघ्र कृती दलाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. शहीद पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील रहिवासी आहेत तर, पोलीस जवान किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी आहे,


पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे यांना गडचिरोली जिल्ह्यात नक्षल विरोधी उत्तम कामगिरीसाठी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झालं होतं. त्यांचे मृतदेह गडचिरोली मुख्यालयात दाखल झाले आहेत. गडचिरोली पोलीस मुख्यालयात शहिदांना सलामी देण्यात येणार आहे. या चकमकीत तीन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपुरात नेण्यात आले आहे. राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे जवान गंभीर जखमी आहेत.


Maharashtra Police | राज्यात गेल्या 24 तासात 66 पोलिसांना कोरोनाची लागण