औरंगाबाद : औरंगाबादच्या नवाबपुरा भागात गादीच्या गोदामाला मोठी आग लागली आहे. गोदामात कापुस आणि फोमच्या गाद्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत आहेत. अग्नीशमन दलाचे चार बंबही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्यासाठी चार बंबासह 8 टँकरही पाठवण्यात आले आहेत.
नवाबपुऱ्यातील एका तीन मजली इमारतीमध्ये हे गादीचं गोडाऊन आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणावर फोम आणि कापूस ठेवण्यात आला होता. तसंच गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या लोकांसह इतरही लोक या इमारतीत राहात होते. इमारतीमधील सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
दरम्यान आग लागलेली इमारत नवाबपुरा भागात असून अरुंद रस्त्यामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. तसंच लोकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यानं अग्नीशमन दलाच्या गाड्या जाण्यास विलंब होत आहे. पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांसह पालिका आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.