बीड : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. गंगाखेड साखर कारखान्याला करारासाठी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ऊसतोड मुकादामाच्या नावावर परस्पर 12 लाख 80 हजारांचे कर्ज उचलल्याचा आरोप रत्नाकर गुट्टे यांच्यावर आहे.


ऊसतोड मुकादमाने गंगाखेड साखर कारखान्यासोबत केलेल्या कराराचे बॉण्ड दिले होते. या बॉण्डचा गैरवापर करत कारखान्याने या दोन मुकादमाच्या नावाने कर्ज उचलल्याचे समोर आल्यानंतर या मुकादमाने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात प्रभाकर केंद्रे आणि रावण केंद्रे यांचे प्रत्येकी 12 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात रत्नाकर गुट्टे, गंगाखेड साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई शाखेच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

नागपूर : गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे नीरव मोदी, धनंजय मुंडेंचा घणाघात



कोण आहेत रत्नाकर गुटे?

रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी आहेत. परळीच्या थर्मल प्लँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनील हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.

रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुटे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या. सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत.

शेतकऱ्यांच्या फसवणूक कर्ज प्रकरणात जेलमध्ये असलेले उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रासपकडून निवडणूक लढविली आणि त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा तब्बल 18 हजार 896 मतांनी पराभव केला आहे.

24 आॅक्टोबर रोजी झालेल्या मतमोजणीत गुट्टे यांनी विक्रमी मते मिळवित विजय संपादन केला. गुट्टे यांना 80 हजार 605 तर शिवसेनेचे विशाल कदम यांना 61 हजार 709 मते मिळाली. जेलमध्ये असतानाही निवडून येण्याची किमया रत्नाकर गुट्टे यांनी साधल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

संबंधित बातमी :


शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटींचं कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा


माझ्यावरील आरोप राजकीय प्रेरित, चौकशीतून सत्य बाहेर येईल : रत्नाकर गुट्टे