जळगाव : कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग नियंत्रण अधिनियमांतर्गत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा रुग्णालयात आधीच वैद्यकीय यंत्रणा तोकडी आहे. अशाच वैद्यकीय यंत्रणेच्या माध्यमातून रुग्णांना चांगली सेवा देऊन जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. मात्र असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. सचिन सरोदे आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहन पाटील हे गेल्या काही दिवसांपासून गैरहजर आहेत. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही ते कर्तव्यावर हजर झाले नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 130 वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु अनेक डॉक्टर कोरोनाच्या संकटकाळात काही वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे सेवा देत नसल्याचे समोर आले आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यापूर्वीच प्रशासक डॉ. बी. एन. पाटील यांना दिल्या आहेत.
जळगावातील कोरोनाचाी सद्यस्थिती
जळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे 116 नवे रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1281 इतकी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचा वाढता दर चर्चेचा विषय बनला आहे. शासनाच्या वतीने मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असले तरी त्यात त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 129 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 556 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट