ठाणे : महाडमधील तळीये गावात दरड कोसळली तो भाग अतिदुर्गम… आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुफान पाऊस, पूरस्थ‍िती आणि असंख्य अडचणी असतानाही एनडीआरएफ जवानांच्याही अगोदर ठाण्यातील एक जवानांचे दल घटनास्थळी पोहचले.  मदत कार्याला लागले आणि  निसर्गाच्या रौद्र रुपासमोर निधड्या छातीने सामोरे गेले, गांवकऱ्यांना धीर दिला, त्या जवानांचे आज सर्वत्र कौतुक होत आहे, ते जाबाज जवान होते… ठाणे महापालिकेच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे(TDRF).


 चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे जवान आज ठाण्यात परतले. 13 जणांच्या या पथकाने अतुलनीय असे काम केले आहे. आज ते परतल्यावर ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम आणि इतर जवानांनी त्यांचे फुलांनी स्वागत केले. या जवानांचे अनुभव थरारक आहेत. ज्यावेळी ते महाडच्या त्या अतिदुर्गम गावाकडे निघाले त्यावेळी एकही रस्ता जाण्यायोग्य नव्हता. पाणी भरलेल्या, दरड कोसळलेल्या रस्त्यातून 8 किमी उंच चढाई करत हे जवान त्या गावात पोचले. तिथे पोचल्यावर देखील जेसीबी, पोकलेन सारख्या मोठ्या मशीन तिथपर्यंत पोचू शकत नसल्याने त्यांनी हातानेच ढीग उपसायला आणि बचावकार्याला सुरुवात केली. "ज्या ठिकाणी दरड कोसळली होती तिथे कमरे पर्यंत चिखल होता. अशा कमरेपर्यंत चिखलात उतरून आम्ही शोधकार्य सुरू केले आणि पहिल्या अर्ध्या तासातच आम्हाला 6 महिन्याच्या चिमुकलीचे शव सापडले, त्यानंतर तिथून 2 किमी पुढे पर्यंत मृतदेह आम्हाला सापडले, एकूण 12 मृतदेह आम्ही शोधून काढले", असे या जवानांचा प्रमुख सचिन याने एबीपी माझाला सांगितले. 


चिखलात पायाखाली काय येते याचा नेम नव्हता. त्यामुळे गम बूट घालून देखील अनेकांच्या पायाला खिळे, पत्रे, काचा आणि असंख्य गोष्टी लागल्याने जखमा झाल्या. त्याही परिस्थितीत त्यांनी शोधकार्य सुरू ठेवले. दोन दिवसांनी एन डी आर एफ तिथे दाखल झाली. तेव्हा त्यांच्या मदतीने शोधकार्य या जवानांनी केले. मात्र दरड पडून 3 दिवस उलटल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. त्यामुळे हे जवान ठाण्यात परतले. ही दुर्घटना ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या गावीच झाल्याने, त्यांनी देखील या जवानांचे खूप कौतुक केले.