गोंदिया : कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या मृत्यूंना जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांना शोधून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केली. शिवाय, जर आधीच शेतकऱ्यांना फवारणीच्या संदर्भात मार्गदर्शन केले असते, तर अशी वेळ या शेतकरी कुटुबियांवर आली नसती, असेही मकरंद अनासपुरे म्हणाले.


गोंदिया-भंडारा जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, अशा आत्महत्यग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी गोंदियात अॅग्रो थिंक टुडे आणि अधिकारी कर्मचारी समन्वय समिती यांनी संयुक्तपणे 'माझी हक्काची भाऊबीज' कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात नाम फाऊंडेशनचे संस्थापक आणि संवेदनशील अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यावेळी मकरंद अनासपुरेंनी उपस्थितांशी संवाद साधला.

गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार वर्षात 32 शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केली, तर भंडाऱ्यात 92 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून, या पीडित कुटुंबांना सरकारने एक लाखांची आर्थिक मदत दिली. मात्र या व्यतिरिक्त कुठलीही मदत दिली नसल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुंटुब उघड्यावर असून त्यांना उर्दनिर्वाहाचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. शरद निंबाळकर यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांची ओवाळणी या महिलांनी केली. मान्यवरांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीला भेटीसह आर्थिक मदत दिली. शिवाय, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी केलेल्या कामाचा आढावा पुढील वर्षी म्हणजे 2018 साली जानेवारी महिन्यात कार्यक्रम घेऊन सर्वांसमोर मांडू, असेही अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितले.