औरंगाबादच्या महापौरपदी शिवसेनेचे नंदकुमार घोडेले विराजमान
एबीपी माझा वेब टीम | 29 Oct 2017 11:33 PM (IST)
औरंगाबाद महापालिकेच्या महापौर- उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला. महापौरपदी शिवसेनेच्या नंदकुमार घोडेले यांनी बाजी मारलीय तर उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे विराजमान झाले आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांचा विक्रमी मतांनी विजय झाला. महापौरपदी शिवसेनेच्या नंदकुमार घोडेले यांनी बाजी मारलीय तर उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे विराजमान झाले आहे. शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला 77 नगरसेवकांनी मतं दिली. तर एमआयएमला 25 आणि काँग्रेसला 11 मतांवर समाधान मानावं लागलं. एका नगरसेवकानं तटस्थ राहणं पसंत केलं. महापालिका सभागृहात हात उंचावून हे मतदान घेण्यात आलं. औरंगाबाद महापालिकेत शिवसेना भाजपची युती आहे, युतीच्या करारानुसार अडीच वर्षे झाल्यानंतर महापौरपद शिवसेनेकडे आहे. त्यानुसार, भाजपनं पदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनेकडे महापौर पद गेले. मावळते महापौर भगवान घडमोडे यांचा कार्यकाळ काल संपला आणि घोडेल यांच्या विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.