अकोला : अकोल्यामध्ये निष्ठुर बापाने तीन मुलांची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या भीतीतून हे हत्याकांड घडल्याची माहिती आहे.

अकोला जिल्ह्यातील धोतर्डी गावात राहणाऱ्या विष्णू इंगळे या शेतमजुराने आपल्या तीन मुलांची हत्या केली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. सुसाईड नोटमध्ये विष्णूने जादूटोण्याच्या भीतीतून मुलांची हत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे.

विष्णूने आधी विष पाजून आपल्या मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, असा अंदाज आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम न झाल्यामुळे दोन मुलांना विजेचा झटका दिला, तर एकाच्या डोक्यात घरातील वरवंट्याने घाव करुन मारलं. हत्याकांडानंतर स्वत: ला इजा करुन बापाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

अजय इंगळे, मनोज इंगळे आणि शिवानी इंगळे या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या विष्णूवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

विष्णूच्या पत्नीचा मागच्या वर्षीच मृत्यू झाला. मोठा मुलगा अजय वडिलांसोबत मजुरी करायचा, तर मनोज आणि शिवानी शिक्षण घेत होते.