सोलापूर : मुलगी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी वडिलांनी गावात उत्सव साजरा केला. एकीकडे स्त्री भ्रूण हत्येसारखा कलंक समाजाला लगलेला असताना, दुसरीकडे अशाप्रकारे सकात्मक आणि आदर्श पावलंही उचलली जात आहेत.

सोलापूर जिल्ह्यतील हत्तुर गावात एक अनोखा स्वागत सोहळा साजरा झाला. एक चिमुकली पाहुणी गावात येणार होती. तिच्या स्वागताला गाव जणू आसुसलेलं होतं. सकाळपासून लोक या चिमुकलीच्या आगमनाची वाट पाहत होते. ही पाहुणी दुसरी-तिसरी कुणी नसून दोन दिवसांपूर्वी जन्मलेली गावची लेक होती. आपल्या तान्हुल्या लेकीच्या स्वागतासाठी तिच्या वडिलांनी मोठा समारंभ आयोजित केला होता.

हत्तुर गावातील सोमनाथ आणि भारती वाघमोडे यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी या मुलीने जन्म घेतला. मुलगी जन्माला आल्याचा आनंद या दाम्पत्याच्या गगनात मावत नव्हता. दवाखान्यातून घरी आणताना वेशीतून स्वागत समारंभ करण्याची योजना जन्मदात्यानी आखली. गावनेही त्यांच्या आनंदात हिरहिरीने भाग घेतला.

सकाळपासून गावात स्वच्छता मोहीम सुरु होती. फटाके तयार होते. रांगोळी काढण्यात आली होती. शाळेतले विद्यार्थी मोठ्या उत्साहात गावच्या लेकीच्या स्वागताला जमले होते. एका नवजात मुलीच्या स्वागताची अशी तयारी म्हणजे स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधातील एक सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल.

सकाळी 11 वाजता लाडक्या लेकीचं गावच्या वेशीत आगमन झालं. फटाक्यांची आतषबाजी करुन या नव्या जीवाचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं. केवळ कुटुंबीय आणि गावकरीच नव्हे तर प्रशासकीय यंत्रणासुद्धा या आनंद सोहळ्याचा भाग बनली होती.

नवजात मुलीच्या आई-वडिलांना झालेला आनंद अवर्णनीय होता. ज्या गावात मुलीच्या जन्मानंतर नाक मुरडली जायची, त्या गावात मुलीच्या जन्माचं स्वागत झालं. हा बदल समाजमनाला नवी दिशा देणारा आहे. हत्तुर गावातला हा स्वागत सोहळा महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असा आहे. तसं झालं तर लेक वाचवा अभियानाला खऱ्या अर्थाने गती येईल.