सोलापूर : दहावीचा निकाल लागला. कुणी काम करता करता अभ्यास करुन पास झाला, तर कुणी घरातल्या बिकट परिस्थितीवर मात करुन. प्रत्येकाच्या यशाची कहाणी वेगळी आणि तितकीच प्रेरणादायी. माढा तालुक्यातील ढेकळे कुटुंबीयातील दोघांची काहाणी तर यापेक्षाही वेगळी आणि इंटरेस्टिंग आहे.


माढा तालुक्यातील वडाचीवाडी येथील ग्रामस्थांसाठी दहावीचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. अर्थात या चर्चेचं कारणही तसेच आहे. वडाचीवाडीचे सरपंच शिवाजी ढेकळे हे दहावीत पास झाले आहेत. पण हा विषय इथेच संपत नाही. शिवाजी ढेकळे यांचा मुलगाही याच वर्षी दहावीत पास झाला आहे. अजूनही हा विषय इथे संपत नाही. या दोघांच्या पास होण्याचे आणखी विशेष म्हणजे, या बापलेकाने सारखेच गुण मिळवून दहावीत बाजी मारली आहे.

 वडाचीवाडी हे माढा तालुक्यातील एका टोकाचे गाव. 42 वर्षीय ढेकळे यांनी सरपंच झाल्यापासून गावाला स्मार्ट गावासह अनेक उपक्रमात बक्षिसे मिळवून दिली आहेत. आज वडाचीवाडी गावात शुद्ध आरओचे पाणी घराघरात उपलब्ध होत आहे. असे हे सरपंच शिवाजीराव मात्र केवळ चौथी पास होते. यावर्षी त्यांनी 16 नंबरचा फॉर्म भरुन दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याला कारण देखील तसेच होते, यंदा त्यांचा मुलगा विश्वजित देखील दहावीची परीक्षा देणार होता.

शिवाजीरावांनी सरपंच म्हणून वर्षभर गावाचा कारभार, शेतीची कामे आणि व्यवसायाची कामं करता करता, दहावीचा अभ्यासही सुरु ठेवला. मुलगा शाळेतून आला की संध्याकाळी वर्गात शिकवलेले धडे व इतर अभ्यास तो वडिलांना शिकवीत असे. सरपंच देखील रोज आपल्या मुलाकडून शाळेतील अभ्यास मन लावून करीत असत. शिवाजीरावांनी राजकीय अभ्यास दांडगा असल्याने ते तिसऱ्यांदा गावाचे सरपंच बनले असले तरी शाळेतील इंग्रजी आणि गणित विषयाने त्यांनाही घाम फोडला होता.

वर्षभर यापद्धतीने नियमित अभ्यास केल्यावर सरपंचाचा परीक्षा केंद्र माढ्यात आला, तर मुलगा विश्वजितचे परीक्षा केंद्र कुर्डुवाडी येथे आले. दोघांनीही अभ्यास करुन परीक्षा दिली आणि निकालादिवशी या दोघांनाही योगायोगाने 500 पैकी 285 (57 टक्के) असे सारखेच गुण मिळाले. याचा सर्वात जास्त आनंद सरपंचाच्या पत्नी राणीताई यांना झाला. गाववाल्यांनी सरपंच आणि त्यांच्या मुलाचा ग्रामपंचायत कार्यालयात जंगी सत्कार केला.

सध्या सर्वत्र गावोगावचे सरपंच शिकलेले येत असताना आपण शिक्षणात मागे राहू नये, शिकल्याने जास्त चांगल्या प्रकारे गावाचा विकास करु यासाठी आपण पुन्हा या वयात शिक्षणाकडे वळलो असून आता पुढील शिक्षण देखील सुरु ठेवणार असल्याचे ढेकळे सांगतात. आपल्याकडे बघून शाळकरी मुलांना शिक्षणातील उत्साह वाढेल असा विश्वास देखील ते बोलून दाखवतात. तर मुलगा विश्वजीतला आपल्या पास होण्यापेक्षा आपण शिकवलेला विद्यार्थी पास झाल्याचा आनंद आहे.