पंढरपुरात ग्रामस्थांचं विहिरीत आमरण उपोषण
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2018 08:53 PM (IST)
गेल्या दोन दिवसापासून ग्रामस्थांनी गावातील खोल विहिरीत आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबत प्रशासन मात्र अजूनही झोपेत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचे वातावरण आहे.
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील उंबरगावातील ग्रामस्थांनी थेट विहिरीत उतरुन आमरण उपोषण सुरु केले आहे. बोअरवेलमधून गावातील विहिरीत पाणी देण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्याने त्याचा खासगी वापर सुरु केल्याचा निषेध ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. उंबरगाव येथे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एक बोअर पडली होती. या बोअरमधून गावाच्या विहिरीत पाणी सोडून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने या बोअरला कुलूप लावून गावाला मिळणारे पाणी बंद केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दोन दिवसापासून ग्रामस्थांनी गावातील खोल विहिरीत आमरण उपोषण सुरु केले आहे. याबाबत प्रशासन मात्र अजूनही झोपेत असल्याने ग्रामस्थांच्या संतापाचे वातावरण आहे.