लातूर : रत्नागिरी ते बुट्टीबोरीदरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारने अनेक ठिकाणी जमीनीचे अधिग्रहण केले होते. त्यामध्ये लातूरमधील औसा येथील 108 शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने घेतल्या. परंतु सरकारकडून अद्याप या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा संपूर्ण मावेजा मिळालेला नाही. यामुळे औसा येथील शेतकऱ्यांनी आज महामार्गाचे काम थांबवले.

कोकणातील रत्नागिरी ते विदर्भातील बुट्टीबोरीला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 हा लातूर जिल्ह्यातून गेला आहे. प्रशासनाने औसा तालुक्यातील जमीन भाग 1 आणि भाग 2 अशी विभागली. त्यापैकी भाग 1 मधील 108 शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गाच्या कामात गेल्या आहेत. या शेतकऱ्यांचा 71 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा मावेजा सरकारने अद्याप दिलेला नाही.

कायदेशीररित्या जमिनीचे अधिग्रहण केल्यास तीस दिवसांच्या आत मावेजा प्रकल्पग्रस्तांना देणे बंधनकारक आहे. तरिही गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना मावेजा देण्यात आला नाही. महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी या महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीच्या कार्यशाळेस कुलूप लावून सर्व वाहने आतच बंद करून ठेवली आहेत. मावेजा मिळत नाही तोवर काम बंद ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.