मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या मनधरणीला अखेर यश आलं आणि ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून उचललेलं उपोषणाचं पाऊल मागे घेतलं. त्यांच्या या निर्णयावरुन आता शिवसेना, राष्टवादी अशा पक्षांतील नेत्यांनी अण्णांवर निशाणा साधला असून, ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत असाच प्रश्न उपस्थित केला आहे.


केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्यामुळं अण्णांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं कारण पुढे आलं. पण, उपोषणापूर्वीच माघार घेतल्यामुळं अण्णांची कृषी कायद्यांबाबत नेमकी काय भूमिका आहे हे सर्वांनाच कळायला हवं असा प्रश्नार्थक टोला सामनातून लगावण्यात आला आहे.


Delhi Blast | चालत्या कारमधून संशयितांनी दूतावासासमोर एक पॅकेट फेकलं आणि....



शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तील अग्रलेखातून अण्णांवर निशाशा साधण्यात आला आहे. ज्यामध्ये त्यांनी उपोषण जाहीर करुन पुन्हा माघार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही असा खोचक टोलाही लगावण्यात आला आहे. लोकशाही, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचा सन्मान याबाबत अण्णांची नेमकी भूमिका काय, सध्याच्या घडामोडींवर त्यांचं मत काय, मुळात कृषी कायदे रद्द करण्यात यावेत ही अण्णांची मागणी असली करीही यावर अण्णांची भूमिका मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळं किमान आतातरी शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्याच्या उद्देशानं तरी अण्णांनी ठामपणे उभं राहणं गरजेचंच आहे ज्यामुळं महाराष्ट्रालाही त्यांची बाजू स्पष्ट होईल असा आग्रही सूर सामनातून आळवण्यात आला.