अहमदनगर : शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा दर्शवत त्यासाठी उपोषणावा बसणाऱ्या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचा अणणांवर प्रभाव पडला आणि त्यांनी हा निर्णय़ घेतला. यामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली. पण, शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं.


अण्णांनी उपोषण जाहीर करुन ते मागे घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, असं म्हणत त्यांनी उपोषणामागच्या हेतूवरच निशाणा साधला. ज्यावर आता खुदद् अण्णांनीच आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिलं आहे.


शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना' दैनिकातील अग्रलेखात मांडण्याच आलेल्या मुद्द्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत कोणा एका पक्षापेक्षा आम्ही समाज आणि देशाला प्राधान्य देतो अशी भूमिका अण्णांनी मांडली. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही तो कसा पाठीशी घातला याबाबतची सगळी माहितीच देईन असा इशाराच अण्णांनी दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय ते सांगा मी सगळंच बाहेर काढतो असं म्हणत अण्णांनी शिवसेनेची चांगलीच कानउघडणी केली.


समाज आणि देशाच्या दृष्टीनं घातक कृत्य घडतात तेव्हा आम्ही आंदोलन करतो. भाजप सत्तेवर असतानाही माझी 6 आंदोलनं झालीच याचा विसर कसा पडला, असा उलट सवाल त्यांनी शिवसेनेला केला.


अग्रलेखात काय म्हटलं होतं?


अण्णांनी उपोषण जाहीर करुन पुन्हा माघार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही असा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला. लोकशाही, शेतकरी आंदोलन, शेतकऱ्यांचा सन्मान याबाबत अण्णांची नेमकी भूमिका काय, सध्याच्या घडामोडींवर त्यांचं मत काय, मुळात कृषी कायदे रद्द करण्यात यावेत ही अण्णांची मागणी असली करीही यावर अण्णांची भूमिका मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. त्यामुळं किमान आतातरी शेतकऱ्यांना नैतिक बळ देण्याच्या उद्देशानं तरी अण्णांनी ठामपणे उभं राहणं गरजेचं असा सूर अग्रलेखातून आळवण्यात आला होता.