शिर्डी : संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा, या मागणीसाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जमाफीसाठी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात आमदार बच्चू कडू आणी शेकापचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता निकष लावून दिलेल्या कर्जमाफी विरोधात आज नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला. सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा ही मागणी करत हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

शिंगणापूर फाट्यावरुन निघालेल्या रॅलीत बच्चू कडू, जयंत पाटील आणि शंकरराव गडाख बैलगाडीत स्वार झाले आणी हजारो शेतकरी घोषणाबाजी करत घोडेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहचले. या हजारोंच्या रॅलीमुळे नगर-औरंगाबाद महामार्ग व्यापून गेला होता. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारला शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.

मेक इन इंडिया, मेड इन इंडियाचा नारा पंतप्रधान देतात, मग देशातील शेतकरी जे पिकवतोय ते मेक इन इंडियात नाही का? असा सवाल उपस्थित करत फक्त टाटा, अंबानी साठी हे धोरण आहे की काय, असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

दरम्यान, यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.