नांदेड : बहुदा नारळ म्हटलं की आपणास कोकणाची आठवण होते. परंतु मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात नारळबाग फुलवली आहे म्हटलं तर आपणास नवल वाटेल. पण ही किमया नांदेड जिल्ह्यातील डोंगरकडा येथील प्रगतीशील शेतकरी त्र्यंबक कुलकर्णी यांनी साधली आहे.


नांदेड जिल्ह्यातील डोंगरकडा येथील प्रगतिशील शेतकरी व इंजिनिअर असणाऱ्या त्र्यंबक कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत कोरोना काळात नारळ बागेच्या उत्पन्नातून आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधली आहे. म्हणतात ना कोकणात नारळ स्वस्त, पण कुणी नांदेडात नारळ स्वस्त म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. कारण डोंगरकड्याच्या त्र्यंबक कुलकर्णींनी त्यांच्या 50 एकर शेतीपैकी 7 एकर शेतीवर नारळ बागेची लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. 


सुरुवातीच्या काळात कुलकर्णी हे पारंपरिक शेती करत ऊस, केळी, कापूस या पिकातून उत्पादन घेत होते. परंतु मराठवाड्यातील बदलत्या आणि लहरी हवामानामुळे पारंपरिक पिकातून म्हणेल तेवढे उत्पादन घेणे शक्य होत नव्हते. कधीकधी तर उत्पादना पेक्षा खत, बी बियाने, लागवड खर्चच जास्त होऊन उत्पन्न कमी होत असे. यातून काहीतरी पर्यायी पीक घेण्याच्या उद्देशाने कुलकर्णी यांनी गोवा येथील नारळ बागेची पाहणी करून नारळ बाग लागवड करण्याचे ठरवले.


इसापूर, एलदरी धरणाच्या मुबलक पाण्यामुळे अर्धापुर तालुक्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी ह्या पिकाची प्रामुख्याने लागवड करून उत्पादन घेतात. परंतु त्र्यंबक कुलकर्णी यांनी या पारंपरिक पिकांना फाटा देत मराठवाड्यातील पहिली नारळबाग नुसती फुलवली नाही तर त्याचे यशस्वी उत्पादनही सुरू केले आहे. स्वतः इंजिनीअर असणाऱ्या कुलकर्णींनी सुरवातीला गोव्यातून नारळाची रोपे मागवली व त्यांची 25 बाय 25 फुटांवर व जवळपास 7 एकर क्षेत्रावर 500 नारळांच्या झाडांची योग्य लागवड केली व योग्य प्रमाणात खतांची मात्रा देऊन जोपासना केली. त्याच प्रमाणे नारळ बागेचे वेळोवेळी योग्य व्यवस्थापन करून कमी पाण्यात बाग यशस्वी रित्या वाढवली व तिसऱ्या वर्षा पासून त्यांना या बागेतून उत्पादन सुरू झाले.


त्र्यंबक कुलकर्णी यांची ही नारळबाग आता 7 वर्षाची असून त्यांना ह्यातून  एकरी 3 लाख पन्नास हजार रुपये उत्पादन मिळतेय, तर या संपूर्ण बागेतून वर्षाकाठी ते 25 लाख रुपयांचे उत्पन्न घेतात. तर या कोरोना काळात सर्वांचे उद्योग बंद असताना कुलकर्णी यांना नारळ बागेने मोठा आधार दिलाय. कारण कोरोना काळात यांच्या नारळ बागेतून मोठ्या प्रमाणात शहाळे, नारळांची विक्री झालीय. त्याच प्रमाणे नारळ बागेतून त्यांना नुसते शहाळे व नाराळतूनच उत्पन्न मिळते असे नाही तर नारळ फुलांपासून ते कल्परस, आईस्क्रीम, सारखे विविध उत्पादने निर्मिती करून  यातूनही मोठे उत्पन्न त्यांना मिळतेय.


बहुतांश शेतकऱ्यांना नवीन फळ पिकाच्या विक्रीसाठी लवकर बाजारपेठ उपलब्ध होत नाही. परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु नारळ पीक घेतल्या नंतर त्याची नासाडी होण्याचे प्रमाण फार कमी आहे. तसेच नारळ पिकास नैसर्गिक कठीण कवच असल्यामुळे त्यास वर्षभर विक्री नाही झाली तरी पीक खराब होण्याचा धोका नाही. त्यामुळे  बाजारपेठ उपलब्ध होण्यास वेळ जरी झाला तरी उत्पन्नावर काही परिणाम होत नाही. पण कुलकर्णी यांना नारळाच्या विक्रीसाठी बाजारपेठ ही शोधण्याची गरज पडली नाही. कारण त्यांच्या बागेतील शहाळे, नारळ ते कोणत्याही बाजार पेठेत जाऊन न विकता व्यापरी थेट बागेत येऊन खरेदी करतात. कोरोना काळात सर्व उद्योगांना घरघर लागली असतांना त्र्यंबक कुलकर्णी यांना मात्र त्यांच्या नारळ बागेने आधार देऊन लाखोंचे उत्पन्न दिलेय.


प्रामुख्याने इतर फळबागांना वर्षातून एक किंवा दोन वेळा फुले लागून फळे येतात.पण नारळास वर्षभरात जवळपास सतरा ते अठरा वेळा बहार अथवा फुले लागतात.त्यामळे वर्ष भरात 12 ते पंधरा वेळा उत्पन्न मिळते त्यात फुलगळ, फळगळ, किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव ही नगण्य असतो. त्यामळे यातून शेतकऱ्यास निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामाना नुसार पारंपरिक पिकांत बदल करून नव नवीन पीक प्रयोग करून त्यातून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे.