लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील शीतल व्यंकट वायाळ या 21 वर्षीय मुलीने सततची नापिकी, हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे आज सकाळी 8 वाजता कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
शीतलने आत्महत्येपूर्वी पत्रात आत्महत्या केलेल्या कारणांचा उल्लेख केला आहे. धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षीही भिसेवाघोली येथील मोहिनी भिसे या शेतकऱ्याच्या मुलीनेही याच कारणासाठी आत्महत्या केली होती.
मी आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली आहे. वडिलांना माझ्या लग्नासाठी कुणीही कर्ज देण्यास तयार नाही, माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये, असं शीतलने पत्रात म्हटलं आहे.
आत्महत्येपूर्वी शीतलने लिहिलेली चिठ्ठी
''मी शीतल व्यंकट वायाळ,
अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडिल मराठा कुणबी समाजात जन्मले आहेत.
शेतात सलग पाच वर्षे नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीत अत्यंत नाजूक आणि हालाखीची झाली आहे.
माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीने करण्यात आली.
पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती.
कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्याने दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं.
त्यामुळे मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी,
परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.
मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.''शीतल वायाळ