सरकारी दरानुसार दूध खरेदीला नकार, शेतकऱ्यांकडून अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2018 12:17 PM (IST)
विविध कारणं देत अधिकाऱ्यांनी दूध ठरलेल्या दरानुसार घेण्यास नकार दिला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेल्या दुधानेच अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक घातला. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीतील ही घटना आहे.
बुलडाणा : सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार दूध खरेदी करण्यास शासकीय दूध संकलन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेल्या दुधानेच अधिकाऱ्यांना दुग्धाभिषेक घातला. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीतील ही घटना आहे. सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार दूध खरेदी केली जाते. मात्र अधिकाऱ्यांनी विविध कारणे देत शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता दूध खरेदी करण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधानेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आंघोळ घालत आंदोलन केलं. चिखली येथील शासकीय दूध डेअरीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेलं दूध हे अगोदर भंडारा येथील शासकीय डेअरीला देण्यात येत होतं. तेथील डेअरी बंद पडल्यामुळे आता हे दूध वारणा डेअरीला पाठविण्यात येतं. त्याठिकाणी या दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर बनविण्यात येते. मात्र त्यांना हवे असलेले फॅट मिळत नसल्याने आणि हे अंतर जास्त असल्याने तिथपर्यंत नेताना दूध खराब होतं. सरकारच्या आदेशाने दूध खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांना दिली. विविध कारणं देत सरकारला शासकीय दूध डेअरी बंद करायच्या असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ''बुलडाणा जिल्ह्याला फक्त 1500 लिटर दूध खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. परिणामी इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना खाजगी दूध डेअरीला कमी भावात दूध द्यावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून बुलडाणा जिल्हा दूध संघाला 10 हजार लिटर दूध खरेदीची परवानगी द्यावी,'' अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.