लातूर : सुरुवातीला साथ देणाऱ्या पावसाने हाता तोंडाशी आलेले शेतमाल मातीमोल केला. नुकसान भरपाई पिक विमा स्वरुपात का होईना मिळेल अशी शेतकऱ्यांची आशा आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना धोका देण्याचं काम महा ई सेवा केंद्र चालकानी केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. राज्यात अनेक गावातील महा ई सेवा केंद्र हे शेतकऱ्यांचा मदतीसाठीच निर्माण केले गेले आहेत. मात्र त्याच केंद्रांतून शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर दाद कुठे मागावी असा प्रश्न निर्माण होत आहे. 


लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ येथील महा ई-सेवा केंद्र चालकांनी अनेक शेतकऱ्यांना फसवले आहे. पिक विमा भरलेल्या रकमेत बिबराळ आणि बाकली येथील सुमारे 400 हून अधिक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून पिक विमा भरताना जी रक्कम घेतली त्यापेक्षा कमी रक्कम विमा कंपनीत जमा केली आहे. ही बाब समोर आल्यावर शेतकरी संतप्त झाले आहेत. त्या केंद्र चालकावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी शिरूर अनंतपाळचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. 


शिरूर अनंतपाळ तालुक्यातील बिबराळ आणि बाकली येथील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी बिबराळ येथे सोय आहे. येथील नितीन भानुदास ऐरोळे यांचे महा ई सेवा केंद्र आहे. याच महा ई सेवा केंद्रातून 400 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पिक विम्याची रक्कम भरणा केली आहे. भरलेल्या रकमेची पावती पण घेतली आहे. मात्र दोन महिन्याच्या कालावधीनंतर भरलेली रक्कम आणि ऑनलाईन ॲपद्वारे दाखवत असलेली रक्कम यात बरीच तफावत दिसून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. महा ई सेवा केंद्र चालकांनी पूर्ण विम्याची रक्कम न भरता आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले आहे. भविष्यात पीक विमा मंजूर झाला तर होणाऱ्या लाभापासून चारशेहून अधिक शेतकरी वंचित राहतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यास सेवा केंद्र चालक जबाबदार असून त्याची ताबडतोब चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. योग्य न्याय दिला नाहीतर सामूहिक उपोषण करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर दोन्ही गावातील 100 शेतकऱ्यांची सही आहे.
  
प्रशासनास याची माहिती मिळाल्यावर आता तपास सुरु आहे. यातून कायद्यानुसार काय उपाय योजना करता येतील याची चाचपणी सुरु आहे. शिरुर अनंतपाळचे तहसीलदार अतुल जताळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंगद सुडके यांनी चौकशी सुरु केली आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल. 


शेतकऱ्यांना आलेले अनुभव 


बाकली येथील बाबूराव शिंदे यानी साडेचार हजार रुपये पिक विमा करिता त्या केंद्रावर भरले होते. पावती जी बनावट आहे मिळाली मात्र त्याच्या नावे
प्रत्यक्षात दोन हजाराचा भरणा झाला होता. बिबराळ येथील रमेश नारायण सालुंखे यांनी 7744 रुपयांचा विमा भरण्याची रक्कम दिली होती. मात्र त्याच्या नावे 4744 रुपयच भरण्यात आले आहेत. त्याच्या कुटुंबातील अनेकांना याच प्रकारे फसविण्यात आले आहे.