कर्जमाफी पारदर्शक होण्यासाठी सरकारने सर्व प्रक्रिया ऑनलाईन करायचं ठरवलं आहे. मात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गावागावांमध्ये इंटरनेट तरी उपलब्ध आहे का, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 15 पानी फॉर्म ऑनलाईन भरावा लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागांमध्ये अजूनही इंटरनेट उपलब्ध नाही.
या 15 पानी फॉर्ममध्ये शेतकऱ्यांना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल. शेतकरी फॉर्म भरण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातील. त्यातही एखादा कागद किंवा आधार किंवा पॅन क्रमांक घरीच विसरला तर तो पुन्हा गावी जाऊन आणायचा का, आम्ही शेती पाहायची की तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारायच्या, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान या सर्व प्रक्रियेमधून सायबर कॅफे चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण इंटरनेट हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध असेलच, असं नाही. त्यामुळे सरकारने यावर काही तरी ठोस उपाय शोधावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संबंधित बातमी :