धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर एका शेतकऱ्यांने त्यांना पत्र लिहिलं आहे, जे सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होतंय. परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलं आहे.
जगमित्र शुगर्स या साखर कारखान्यानिमीत्त धनंजय मुंडे यांनी केलेले जमिनीचे व्यवहार वादग्रस्त ठरले असून यातील काही प्रकरणांची न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याचं मुंजा गित्ते यांनी नमूद केलं आहे.
“प्राण देण्यापेक्षा आमच्या जमिनी परत द्या” या मागणीला धनंजय मुंडे काय प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल.
धनंजय मुंडे यांची पोस्ट काय होती?
‘’राज्यातील महामार्गासाठी लागणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या सहमती शिवायही ताब्यात घेण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. शेतकऱ्यांच्या सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन मी ताब्यात घेऊ येणार नाही त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर. हा कायदा आम्ही कदापीही संमत होऊ देणार नाही.’’, असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं होतं.
शेतकरी मुंजा गित्ते यांचं पत्र :
प्रति
मा.धनंजयजी मुंडे
मा.महोदय
सोशल मिडीया मधुन काल तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी जीव देण्याची तयारी दाखवली असल्याचे वाचन्यात आले.
वाचल्यानंतर अतिशय भावविवश झालो.
आता तुमच्या मतदारसंघातील माझ्यासारख्या व्यक्तीने शेतजमिन वाचवण्यासाठी तुमच्याकडेच दाद मागीतली पाहीजे असा निर्धार करुन हे निवेदन तुम्हाला ऊद्देशुन पुर्ण शुद्धीत व कुणाच्याही दबाव अमिषाला भिक न घालता लिहीत आहे हे सुरुवातीलाच नमुद करतो.
महोदय,
परळी तालुक्यातील अनेक वर्षांपासुन नियोजीत संत जगमित्र साखर कारखान्यासाठी आपण माझी पुस शिवारातील गट नं.36 मधील 3 हेक्टर 12 आर इतकी जमिन खरेदी केली मात्र त्याचा मोबदला दिला नाही.
मोबदला देण्यासाठी खेटे घातल्यानंतर आपण चाळीस लाखांचा खोटा चेक देऊन फसवणुक केलीत.
कारखाना सुरु करुन माझ्या कुटुंबातील चार पाच जणांना नोकरी देण्याचे आश्वासन तर कारखाना कागदोपत्रीच राहील्याने कधीच पुर्ण होणार नाही हे ही स्पश्ट आहे.
सदरील प्रकरणी आपण व आपल्या गुंडांनी मला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देऊन दबाव आणला असला तरी न्यायालयीन प्रक्रीयेवर विश्वास ठेवुन मी व माझ्यासारखे अनेकजण तुमच्या जमीन हडपण्याविरुद्ध कायदेशीर लढा लढत आहोत.
याच जगमित्र कारखान्यासाठी म्हणुन अशाच पद्धतीने बनाव करुन आपण श्रीमती पार्वतीबाई रंजित गिरी या 90 वर्षीय वृद्धेचीही लुबाडणूक केल्याचेही प्रकरण न्यायाच्या प्रतिक्षेत असुन सदरील महिलेने काही महिन्यांपुर्वी न्याय मिळत नसल्याने आत्महत्येची प्रशासनाकडे परवानगी मागीतली आहे.
आपले कालचे शेतकऱ्यांच्या जमिनीविषयीचे निवेदन वाचुन शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आपल्या जीव देण्याच्या प्रतिज्ञेवरुन आम्हाला तुमचे मतपरिवर्तन झाल्याची खात्री वाटत आहे.
तरी आपण जगमित्र साखर कारखान्याच्या नावाने लबाडी करुन लाटलेली शेतकऱ्यांची शेकडो एकर जमिन आपल्या प्रतिज्ञेला जागुन परत करुन महाराष्ट्रापुढे आदर्श ऊभा करावा ही कळकळीची हात जोडुन विनंती.
या आमच्या हक्काच्या जमिनी परत मिळाल्यास माझ्या सारख्या अनेक कुटुंबांवर जीव देण्याची आलेली वेळ टळेल .
कळावे..
मुंजे किसन गित्ते, रा. तळणी