सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने इंग्रजीत 400 पानांची कांदबरी लिहिलीय. ‘किंग्डम इन ड्रिम... द प्राईम मिनिस्टर’ असे कादंबरीचे नाव असून, अमेरिकेच्या प्रकाशन संस्थेनं ही कांदबरी प्रकाशीत केलीय. अमेझॉन-फ्लिपकार्टवर कादंबरी विक्रीला ठेवण्यात आली आहे.
पांडुरंग मोरे असे या शेतकऱ्याचे नाव असून, बार्शी-सोलापूर रस्त्यावरचं पानगाव हे त्यांचं मूळ गाव आहे. 15 हजार लोकसंख्येच्या पानगावातच पांडुरंग बारावीपर्यंत शिकले. बार्शीत बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून एमए शिक्षण घेतलं.
पांडुरंग मोरे यांनी 400 पानांची ‘किंग्डम इन ड्रीम.. द प्राईम मिनिस्टर’ ही कादंबरी लिहिलीय. सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थिती, लोकांची अवस्था हा कादंबरीचा विषय आहे. कांदबरीत भारत सरकार आणि दोन राजकीय पक्षांच्या धोरणांवर टीका होती. त्यातली टीका प्रकाशकांनी बदल करण्यास सूचवले.
तिशीतले पांडुरंग आपल्या आठ एकर शेतात कुळवणी, पेरणी, खुरपणी, कापणी, काढणी, मळणीची सगळी काम करतात. आई-वडिलांची पांडुरंगला नोकरदार बघण्याची इच्छा अपूर्ण राहिली.
दरम्यान, गेल्या 5 वर्षात पांडुरंग यांनी दोन इंग्रजी कादंबऱ्या, तीन इंग्रजी नाटकं, दोन कविता संग्रह लिहिलेत. नुकतीच प्रकाशित झालेली ‘पॅट्रीएज इंडिया’ आंतरराष्ट्रीय पब्लिकेशननं प्रकाशित केलीय. छापील आणि ई-बुक स्वरुपात अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.