पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत घेतली जाणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 दरम्यान घेण्यात येईल.


विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी व्हावा आणि अभ्यासक्रमाचं नियोजन करता यावं, यासाठी यावर्षी दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा लवकर जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलं.

गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची, तर शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.

5 ऑक्टोबर 2018 रोजी www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

संभाव्य वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडे येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, अशीही माहिती बोर्डातर्फे देण्यात आली. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा-महाविद्यालयांना देण्यात येईल.