सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सावकाराच्या तावडीतील जमीन सोडवून शेतकऱ्याला हक्काची जमीन प्रशासनानं पुन्हा मिळवून दिली आहे. सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आणि जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवी कहाणी आपण अनेकदा ऐकतो. पण सोलापूर जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला मात्र प्रशासनानं मोठा दिलासा दिला आहे. एका सामान्य शेतकऱ्याचा दीड तपाचा संघर्ष प्रशासनाच्या मदतीने यशस्वी झाला आहे. तसंच सोलापूर जिल्ह्यातली ही पहिलीच केस असल्याचा दावाही उपनिबंधक कार्यालयानं केला आहे.


सोलापूर जिल्ह्यातल्या परिते गावचे 76 वर्षीय शेतकरी गोरख बाबू कुंभार 17 वर्षांची लढाई जिंकली आहे. सन 2014 मध्ये महाराष्ट्र सावकारी (नियमन) हा कायदा मंजूर झाला. तेंव्हापासूनची  सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. 1999 मध्ये तीस हजार रुपयांसाठी एक हेक्टर 21 आर जमीन  बबन रणदिवे या सावकाराकडे गहाण ठेवली होती. रणदिवे यांनी ती परस्पर बाबू धनवडे या व्यक्तीला  विकली. यावर आक्षेप घेऊन कुंभार यांनी उपनिबंधक कार्यालयात अर्ज दाखल केला होता.

2011 साली धनवडे यांच्या नावे झालेल्या शेतीला कुंभार यांनी आव्हान दिलं होतं. गेली सोळा वर्षे कायदेशीर प्रक्रिया चालत राहिली. पण 2014 साली झालेल्या सहकार अधिनियम कायद्याने कुंभार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 20 ऑक्टोबर 1999 रोजीच खरेदीखत सावकारीच्या ओघात प्रतिभूती म्हणून लिहून दिल्याने अवैध ठरवून रद्द करण्यात आलं. दोघांनी मिळून  सावकारी अंतर्गत गहाणखत केल्याने  तोही रद्द करण्यात आला आणि शेतजमीन गोरख कुंभार  यांना परत करण्यात आली.

सोलापूरच्या उपनिबंधक कार्यालयानं प्रामाणिक प्रयत्न आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एका गरीब शेतकऱ्याला त्याच्या हक्काची जमीन परत मिळवून दिली. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शासन आदेशाची प्रत कुंभार यांना देण्यात आली. आदेशाची एक प्रत महसूल विभागाकडेही पाठविण्यात आली आहे. त्यांच्या  दफ्तरी  जमिनीवर गोरख  कुंभार यांच्या नावाची नोंद करण्याची सूचना देण्यात आली आहे.