जळगाव : सरकारच्या कर्जमाफी योजनेतील भोंगळ कारभाराची विविध प्रकरणे आता चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. जळगावचे माजी खासदार वसंतराव मोरे यांनी कोणताही अर्ज भरला नसताना कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 15 हजार 482 रुपये जमा झाले आहेत.
ज्यांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे, त्यांना लाभ मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार लोकप्रतिनिधींना कर्जमाफीचा लाभ घेता येत नाही. मात्र माजी खासदार वसंतराव मोरेंच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम कशी जमा झाली, हा प्रश्नच आहे. या प्रकारानंतर मिळालेली रक्कम परत करुन वसंतराव मोरेंनीही कर्जमाफीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले होते. आमदार आबिटकरांनीही कर्जमाफीसाठी अर्ज भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी कर्जमाफीचे 25 हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाल्याचं सभागृहात निदर्शनास आणून दिलं. प्रकाश आबिटकर हे कोल्हापुरातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
जर माझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाला असेल, अशी शक्यता आबिटकर यांनी वर्तवली होती.