बुलडाणा : नदीवरील पुलाच्या कडेवरुन सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलासह त्याचे आई-वडीलही वाहून गेले. बुलडाण्यातील खिरोडा भागात सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात अख्खं कुटुंब नदीत वाहून गेलं.


बुलडाण्यात शेगाव-संग्रामपूर रस्त्यावर पूर्णा नदीजवळ ही घटना घडली. बुलडाणा अर्बन बॅंकेत लिपिक पदावर कार्यरत असलेले 46 वर्षीय राजेश चव्हाण आपली पत्नी सारिका आणि मुलासह सेल्फी काढत होते. त्यावेळी राजेश यांचा बारा वर्षांचा मुलगा श्रवणचा पाय घसरला आणि तो नदीत पडला.



लेकाला वाचवण्यासाठी राजेश यांनी नदीत उडी मारली, त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नीनेही मुलाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. पण नदीच्या पाण्याला वेग असल्यामुळे तिघेही वाहून गेले. राजेश चव्हाण हे शेगाव तालुक्यातील कवठा गावचे रहिवासी होते.

पूर्णा नदीला मोठा पूर आला असून पुलाच्या दहा फूट खाली पाणी वाहत आहे. नदीपात्रात तिघांचा शोध घेतला जात आहे मात्र या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.