मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागातील तीन वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याची बदली केल्याने लिपीकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन लिपिकाचे निलंबन करण्यात आले असून संबंधित अधीक्षकास यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे.
दुय्यम निरीक्षकाचे निधन झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे न पाठवल्याने त्यांचा विभागाच्या नियतकालिक बदल्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. राज्य उत्पादन शुल्क आयुक्तालया अंतर्गत राज्यस्तरीय संवर्गातील दुय्यम निरीक्षक (गट-क) पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 181 कर्मचाऱ्यांच्या शासनाने बदल्या 7 जुलै रोजी केल्या होत्या. या बदल्यांच्या आदेशात एस.एम. साबळे यांची कोल्हापूर येथून नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील भरारी पथकात बदली करण्यात आली होती.
कोल्हापूर अधीक्षक कार्यालयाकडून कर्मचाऱ्याचा अद्ययावत सेवा तपशील न मिळाल्याने मुंबईतील आयुक्त कार्यालयाकडे असलेल्या तपशीलावरुन बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीतील साबळे यांचं नाव बदलीसाठी काढण्यात आलेल्या आदेशात समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र साबळे यांचे 2013 मध्ये निधन झाल्याचे त्यानंतर लक्षात आलं. त्यामुळे आयुक्तालयामार्फत तातडीने साबळे यांच्या बदलीचे आदेश न पाठण्याबाबत कोल्हापूर विभागीय आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांना कळवण्यात आलं.
कोल्हापूरच्या जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडून साबळे यांचे निधन झाल्याबाबतचा अहवाल आयुक्तालयास प्राप्त न झाल्याने हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे या दिरंगाईस जबाबदार असणाऱ्या जिल्हा अधीक्षक कार्यालयातील लिपीकास निलंबित करण्यात आले असून संबंधित अधीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण आज सरकारकडून देण्यात आलं.