मुंबई : दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी प्रशासन दररोज ३५९ जादा विशेष बस सोडणार आहे. राज्यातील प्रत्येक आगारातून २४ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत जादा बस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे.

प्रवाशांना गावी जाण्यासाठी आणि परतीच्या प्रवासासाठी विशेष बसच्या आरक्षणाची सुविधा एसटीने प्रवाशांसाठी बस स्थानकावर उपलब्ध करून दिली आहे. दिवाळी हंगाम संपेपर्यंत एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळी तिकीट दरवाढ न केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

२५ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, २७ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, २८ ऑक्टोबरला दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा आणि २९ ऑक्टोबरला भाऊबीज आहे. यानिमित्त दिवाळीनिमित्त बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.

पुण्यातून ६४,  मुंबई १२, ठाणे १९, पालघर २२, रत्नागिरी १४, सिंधुदुर्ग ८, कोल्हापूर ७, सातारा ३, सांगली ४, अमरावती २, यवतमाळ ५, नाशिक २३, जळगाव ८, धुळे ३५, अहमदनगर ९, औरंगाबाद १४ बीड ९, जालना ५, लातूर १०, नांदेड १३, उस्मानाबाद ११, परभणी २३ अशा विभागवार जादा विशेष बस सोडण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने केला आहे.

‘प्रवासी मित्र’द्वारे विशेष गाड्यांची माहिती
एसटीच्या विभागातील कर्मचाऱ्याला प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘प्रवासी मित्र’ म्हणून नेमण्यात आले आहे. आगारातील, बस स्थानकातील विशेष गाड्या, थांब्यांची माहिती या ‘प्रवासी मित्र’या द्वारे प्रवाशांना देण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, असे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.