मुंबई : कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे. यामध्ये अधिवेशनाचा कालावधी एक आठवड्याने वाढवावा अशी आग्रही मागणी करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. एसटी (ST)कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही कालावधी वाढवण्याचा आग्रह धरत असल्याचे पाटील म्हणाले. तर राज्य सरकार हे लोकशाहीचे रक्षक असतील तर कालावधी वाढवतील, भक्षक असतील तर थांबवतील असा टोला यावेळी भाजपचे नेते सुधीर  मुनगंटीवार यांनी लगावला.


राज्य सरकारला फक्त  पुरवणी मागण्यामध्ये आणि विधेयकामध्ये इंटरेस्ट आहे. ओबीसी आरक्षणाबाबत काल सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय मांडला आहे. अभ्यास करून इनपुट आम्ही दिले असल्याचे पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्य सरकारची भूमिका काय आहे, हे पाहून आम्ही काय करायचे ते ठरवू असे पाटील यांनी सांगितले. आज सभागृहामध्ये पेपर फुटीवर आम्ही आक्रमक होणार आहोत, कारण सरकार खूप हलक्यात घेत आहे. पेपर फुटीची सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. राज्य सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे, गेंड्यालाही लाज वाटेल असे यांचे काम असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.


कोरोनाची काळजी घेतलीच गेली पाहिजे, त्याच्या आड लपून प्रश्नांची उत्तर देणं योग्य नाही. सध्या कायद्याचा धाक राहिला नाही, फडणवीस यांच्या काळात सगळं सुरळीत होतं. मात्र, आता गुन्ह्यांची नोंद वाढली असल्याचे पाटील म्हणाले. राज्य सरकार हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर अधिवेशन संपवतील, असा टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. “आमची मागणी असेल की एक आठवडा अधिवेशन वाढवावे. जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा, असे मुनगंटीवार म्हणाले.
 


महत्त्वाच्या बातम्या: