Maharashtra Exit Polls 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. मतदानानंतरचा पहिला एक्झिट पोल समोर आला आहे. एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलनुसार युतीला राज्यात 34 जागा जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील लोकसभेच्या निवडणुकीतील निकालाशी या एक्झिट पोलची तुलना केली तर युतीला 7 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रातील 48 जागांबाबत महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे येत्या 23 मे रोजी स्पष्ट होईल. मात्र एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात शिवसेना 17, भाजप-17, काँग्रेस-4, राष्ट्रवादी- 9 आणि स्वाभिमानीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडी मोठा गाजा वाजा करुन निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मात्र वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत भोपळाही फोडता येणार नसल्याचं एबीपी-नेल्सनच्या एक्झिट पोलमधून समोर येत आहे.

लोकसभेच्या निवडणूक 2014 शी एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलची तुलना केली, तर भाजपला 6 जागांचा तर शिवसेनेला एका जागेचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 5 जागा वाढण्याची शक्यता आहे.



एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोलच्या आकडेवारी

शिवसेना - 17
भाजप -17
काँग्रेस - 4
राष्ट्रवादी - 9
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

लोकसभा निवडणूक 2014 निकाल

शिवसेना - 18
भाजप - 23
काँग्रेस - 2
राष्ट्रवादी - 4
स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1

लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. केंद्रात कोणाची सत्ता येणार, याचा फैसला होईलच, मात्र 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

11 एप्रिलला लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली. आज (19 मे) सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्याने लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.