उस्मानाबाद : मराठा मोर्चांना नेतृत्त्व नाही आणि निश्चित अशी काही ध्येय-धोरणं नाहीत. यातला एकही मोर्चा उस्फूर्त नव्हता आणि आजही नाही, असे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.

पुढील दोन वर्षे मराठा संघटनेच्या बांधणीचा पुरुषोत्तम खेडेकरांनी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्त उस्मानाबादमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ते एबीपी माझाशी बोलत होते.

फडणवीस सरकारचं काम चांगलं चाललं आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “फडणवीस सरकारचं कामकाज कुठल्या अंगाने चांगलं आहे, हा एक वेगळा विषय आहे. पण सामान्य माणसाच्या अंगाने पाहिलं तर काम चाललंय, हे म्हणणंच मोठं अवघड आहे. कारण सामान्य लोकांना शासन अस्तित्त्वात आहे, असं वाटत नाही.”

“शरद पवार हे सत्यशोधक कुटुंबामध्ये जन्माला आले आहेत. फुले-शाहू-आंबेडकारी विचारधारेचा प्रभाव पवारांवर आहे. त्यामुळे त्यांना अजूनही काही बाबी ब्राम्हण-ब्राम्हणेतर या अंगाने दिसत असतात. त्या चालतातही. त्यात काही वावगं आहे, अशातला भाग नाही.”, असेही यावेळी खेडेकर म्हणाले.

“सकल मराठा क्रांती मोर्चापासून मी दूर राहिलो होतो. या मोर्चांमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला होता. त्यामुळे एवढे मोठे मोर्चे इतरही समाजाचे निघाले. मोर्चे निघणं आणि त्यातून काहीही नुकसन न होणं, याकडे जरी सकारात्मक अंगाने बघितलं, तरी कुठल्याही शासनकर्त्याला त्याच्या कार्यकाळात असे अशांत स्वरुपाचे मोर्चे निघणं अभिमानास्पद नाही.”, असं मत पुरुषोत्तम खेडेकर यांनी मांडलं.

पुरुषोत्तम खेडेकर कोण आहेत?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अभियंता असलेले पुरुषोत्तम खेडेकर हे 'मराठा सेवा संघा'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘संभाजी ब्रिगेड' आणि इतर मराठा समाजाच्या संघटनांशी संबंधित असून, 'शिवधर्म' संस्थापनाची भूमिका घेऊन राज्यभर प्रचार आणि प्रसार करतात.

2004 सालच्या जेम्स लेन प्रकरणात पुण्याच्या 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रा'वर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांची भूमिका महाराष्ट्रभर अधिक चर्चेत आली.

खेडेकरांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेषत: ब्राम्हण वर्गावरील टीकात्मक लिखाणामुळे ते कायम वाद आणि चर्चेत राहिले आहेत. 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या त्यांच्या पुस्तकातील काही लिखाणामुळे त्यांच्यावर खटलाही चालला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर स्थापन करण्यात आलेल्या मराठा संघटनांच्या समितीतही ते सहभागी होते. त्यांच्या पत्नी रेखा खेडेकर या भाजपाच्या चिखली मतदारसंघातून आमदार होत्या.

पाहा व्हिडीओ :