मुंबई : पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी एक्स्ल्युझिव्ह बातचित केली.
राजेश टोपे म्हणाले की, "मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांच्या नावाची नोंदणी केली आहे. त्याच्या तुलनेत लसीचे डोस थोडे कमी आले आहेत. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे 16 जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे."
लसीकरण केंद्रांबाबत बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी मी नियोजन केलं होतं की, ते 511 लसीकरण केंद्रासाठी केलं होतं. पण काल झालेल्या बैठकीत केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या की, लसीकरण एवढ्या मोठ्या स्तरावर करु नका. कारण लसीकरणासोबतच रुग्णालयातील इतर सेवाही सुरळीत राहणं गरजेचं आहे. त्यामुळे केंद्राच्या सूचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्या 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 100 जणांना लस देण्यात येईल. अशाप्रकारे पहिल्या दिवशी 35 हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस आहे."
पाहा आरोग्यमंत्र्यांची एक्स्ल्युझिव्ह मुलाखत : महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले : आरोग्यमंत्री राजेश टोपे
पुढे बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, "महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या वतीनं 9 लाख 63 हजार लसींचा डोस उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला सतरा ते साडेसतरा लाख लसींच्या डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख लसींचे डोस दाखल झाले आहेत." पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले की, "केंद्र सरकारच्या सुचनेनुसार, ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण दोन लसींचे डोस द्या. त्यामुळे राज्याच्या क्षमतेनुसार, आपल्याकडे 55 टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे ज्या 8 लाख लोकांना आम्हाला लसीकरणं करायचं आहे. त्याच्या 55 टक्के म्हणजेच, साधारण 5 लाखांपर्यंत आम्ही लसीकरण पूर्ण करणार आहोत."
लसीकरणाबाबत आवाहन करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, "लस अत्यंत सुरक्षित असून सर्वांनी घ्यावी, असं मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. आरोग्य सेवक खरे लढवय्ये आहेत. 'मी लसीकरण करणार, मी स्वतः सुरक्षित राहणार, मी इतरांना सुरक्षित ठेवणार' असा संदेश त्यांनी लस घेऊन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे."
राजेश टोपे म्हणाले की, "आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स यांचं लसीकरण झाल्यानंतरच मंत्रिमंडळातील सर्वांनी लस घेतली पाहिजे. त्यामुळे आधी दुसऱ्यांची काळजी करुया, मग स्वतःची काळजी घेऊया." तसेच लसीकरणाला घाबरु नका, पुढाकार घ्या आणि लसीकरण करुन घ्या, असं आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :