परभणी : परभणी जिल्ह्यात पडलेला पाऊस मोजण्यासाठी शासकीय आणि विविध पातळीवर खाजगी संस्थांची व्यवस्था असते. याच पावसाच्या आकडेवारीवर पेरणी आणि पुढे दुष्काळ, पीक विमा याबाबतचे शासकीय धोरण ठरत असते. परंतु परभणीत याच पावसाच्या मोजलेल्या आकडेवारी बाबत मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. कारण परभणीत एका रात्रीतील 4 तासात तब्बल 186.2 मिमी पाऊस पडल्याचा दावा भारतीय हवामान खात्याने केला आहे. ज्याची नोंद देखील आहे. मात्र याच दिवशी याच वेळी 85 मिमी पावसाची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याहून अधिक म्हणजे कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने तर 58.8 मिमी ची नोंद केली आहे. त्यामुळे नेमके खरे आकडे कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळं खरच हा पाऊस एवढा पडलाय का? याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती नेमली आहे.


परभणी शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात भारतीय हवामान खात्याची वेधशाळा आहे. तिथं 11 जूनच्या रात्री 1 ते 5 या 4  तासात 186.2 मिमी एवढा पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इथूनच एक ते दीड किलोमीटर वर जिल्हाधिकारी कार्यालय आहे. जिथे महसूल विभागाचे पर्जन्यमापक आहे तिथं 85 मिमी आणि जिल्हाधिकारी कार्यालयपासून तीन किलोमीटर वर कृषी विद्यापीठाची वेधशाळा आहे तिथे 58.8 एवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

एकाच शहरातील काही अंतरावरील तीन ठिकाणी वेगवगेळी आकडेवारी आणि नेमका किती पाऊस पडलाय? याचा शोध जिल्हाधिकारी यांनी नेमलेली समिती घेणार आहे. पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी ब्रिजलाल बीबे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, तहसीलदार मंदार इंदूरकर, कृषी विद्यापीठाच्या हवामान भागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे आणि भारतीय हवामान खात्यातील एक अधिकारी अशा 5 जणांचा समावेश आहे. ही समिती 2 दिवसात या पावसाचा शोध घेऊन जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करणार आहे तेव्हाच नेमकी कुठली आकडेवारी खरी आहे स्पष्ट होणार आहे.