नागपूर : घरामध्ये सोय म्हणून अनेकजण पाणी तापवण्यासाठी गिझरचा वापर करतात. पण या उपकरणांची नीट काळजी न घेणं किंवा त्यांना हाताळण्यात चूक करणं किती महागात पडू शकतं याचं उदाहरण नागपुरात समोर आलं आहे. गिझरच्या स्फोटात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.


नागपूरच्या म्हाळगीनगर परिसरात महात्मा गांधी नगरात राहणाऱ्या 84 वर्षीय कृष्णराव भोयर यांचा या घटनेत मृत्यू झाला. 2 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नित्यक्रमानुसार कृष्णराव योगा आणि मॉर्निग वॉक आटपून घरी परतले आणि सव्वा आठ वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले. त्यांनी नेहमीच्याच गॅस गिझरमधून तापलेले पाणी घेतलं. मात्र, पाण्याचं तापमान जास्त वाटल्यामुळे त्यांनी गिझरचा व्हॉल्व कमी करण्याचा प्रयत्न केला.

तेवढ्यातच जोरदार आवाजासह गिझरजवळ स्फोट झाला आणि कृष्णराव खाली कोसळले. स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की तो शेजाऱ्यांच्या घरापर्यंत ऐकू गेला. घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असलेल्या कुटुंबीयांना कृष्णराव यांचा आवाज ऐकू आल्याने सर्वांनी बाथरूमकडे धाव घेतली. तेव्हा कृष्णराव भाजलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळलेले होते.

भोयर कुटुंबीयांनी लगेच कृष्णराव यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी ते 70 टक्के भाजल्याचं सांगितलं. रुग्णालयात 5 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 6 फेब्रुवारीच्या रात्री कृष्णराव यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गॅस गिझर ब्रँडेड असताना आणि गॅस सिलेंडर योग्य असताना अशी घटना कशी घडली, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

विजेचा लपंडाव होत असल्यामुळे अनेक कुटुंब शाश्वतीने पाणी तापवणारे गॅस गिझर वापरतात. भोयर कुटुंबाकडे लागलेले गॅस गिझर ब्रँडेड कंपनीचं होतं. नेहमीच ठराविक कालावधीने त्याची दुरुस्तीही केली जायची. असं असतानाही ही दुर्दैवी घटना का घडली, हा सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला आहे.