ठाणे : ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ईव्हीएम, तसेच मतदान ओळखपत्र सापडल्यानंतर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून निवडणूक आयोगावर सडकून टीका केली होती. यानंतर ठाण्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केला आहे. ईव्हीएम प्रकरणात मुख्य निवडणूक अधिकारी अशोक शिंगरे यांनी या निवडणूक साहित्याचा आणि सध्याच्या निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे साहित्य पाहताना त्याठिकाणी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असल्याचे देखील शिंगरे यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट डिलीट केलं
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट डिलीट केलं आहे. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या एका खोलीत इव्हीम मशीन सपडल्यानंतर आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या मशीन कोठून आल्या? हे कोणते ईव्हीएम आहेत? ईव्हीएम बदलले जातात ही साशंकता आहे, असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्यांनी पोस्ट डिलीट केली आहे.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये जिन्याखाली एका खोलीत ईव्हीएम मशीन सापडले. जर ठाणे जिल्ह्यात 100 ईव्हीएम आले तर ते 100 ईव्हीएम मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्याच्या हातात द्यावे लागतात. हे ईव्हीएम राहिले कसे? हे कुठले ईव्हीएम आहेत? ईव्हीएमचा घोटाळा होतो, ईव्हीएम बदलले जातात. ही जी मनातली साशंकता आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्या निकालाशी मी फारसा सहमत आहे असं नाही. मला माझं मत कुठे गेलंय हे कळलच पाहिजे, माझ्या मनात शंका का राहावी? माझं मत कुणाला गेले हे कळलच नाही तर शंका निर्माण होणारच ना की माझं मत नक्की कुठे गेले? या संशयामुळेच अमेरिकेतल्या ईव्हीएम मशीन काढून घेतल्या असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या