पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा टायपिस्ट खंडणी प्रकरणी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 07 May 2017 08:53 AM (IST)
मुंबई : पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्याकडे टायपिस्ट म्हणून काम करणाऱ्या महेश सावंत यांना अटक करण्यात आली आहे. वाळू ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्याचा सावंत यांच्यावर आरोप आहे. महेश सावंत यांनी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन विदर्भातील एका व्यावसायिकाला कारवाई टाळण्यासाठी खंडणी देण्याची मागणी सावंतांनी केल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे रामदास कदम यांनीच महेश सावंत यांना मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात दिलं. गुरुवारी महेश सावंतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर शुक्रवारी त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. सावंत यांनी खंडणी मागितल्याची माहिती शिवसेना विभाग प्रमुखांनी कदम यांना दिली होती. त्यानंतर फोन टॅप करुन कदम यांनी याविषयी माहिती मिळवली. मलबार हिल पोलिसांना बोलावून सावंतांविरोधात पुरावे देण्यात आले. त्यानंतर महेश सावंतांना पोलिसांनी अटक केली.