धुळे : आपल्या सामाजिक कार्यातून भारतासह परदेशातही ठसा उमटविणारे प्रा. डॉ. जगन्नाथ वाणी यांचं कॅनडात कर्करोगाने निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यावर कॅनडातच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साल 1965 पासून ते कॅनडामध्ये स्थायिक आहेत.
डॉ. वाणी यांनी धुळ्यात का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, मूक बधिरांसाठी शाळा स्थापन केली.
विज्ञानाच्या प्रचार, प्रसारासाठी रेऊ वाणी विज्ञान विहार, गरीब विद्यार्थ्यांची गावोगावी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप, कमलिनी आय हॉस्पिटलची उभारणी आणि गरीबांना मोफत उपचाराची सोय उपलब्ध करुन दिली.
शस्त्रक्रिया, सिजोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांसाठी पुण्यात सामाजिक कार्याची उभारणी आणि त्यातील संघटनातून राज्यभरातील अशा रूग्णांच्या मदतीसाठी पुढाकार आदी विधायक कार्यातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
विमा-संख्याशास्त्र या विषयाचे संशोधक - प्राध्यापक म्हणून कॅनडाच्या विद्वत वर्तुळात डॉ. वाणी प्रसिद्ध होते. डॉ. वाणी यांनी केलेल्या प्रदीर्घ सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘ऑर्डर ऑफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
ज्या ठिकाणी डॉ. वाणी राहिले त्या उत्तर अमेरिकेलाही त्यांनी भरभरून दिलं. भारतीय संगीत आणि नृत्याच्या प्रसारार्थ त्यांनी स्थापन केलेली ‘रागमाला सोसायटी’ असो, की तुलनेने विरळ मराठी वस्ती असलेल्या कॅलगरी भागात मराठी भाषकांना एकत्र आणणारी ‘ कॅलगरी मराठी असोसिएशन’.
उत्तर अमेरिकेतल्या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी असत. 2001 साली कॅलगरी या सुंदर गावात बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे आयोजनही त्यांनी एकट्याच्या बळावर यशस्वीपणे तडीला नेलं होतं.
एवढेच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतल्या या सर्वात भव्य मराठी आयोजनांमध्ये लेखक-विचारवंतांनाच अध्यक्ष म्हणून बोलावण्याची परंपरा डॉ. वाणी यांनी मोडली आणि डॉ. अभय बंग यांना आमंत्रित केलं. त्यानंतरच्या मराठी अधिवेशनांमध्ये महाराष्ट्रातल्या सामाजिक कामांना मानाचं पान मिळत गेलं, त्यामागे डॉ. वाणी यांचा कृतीशील आग्रहच होता.