Verul waterfall: मराठवाड्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आता जोरदार हजेरी लावली आहे.नदी, ओढे ओसंडून वाहत असून पर्यटकांची पावले आपोआप जगप्रसिद्ध लेण्यांकडे वळू लागलीयेत. काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने खुलताबाद, वेरुळ परिसरातील लहान मोठे धबधबे कोसळू लागले आहेत. वेरूळचे आकर्षण असणारा धबधबा सुरु झाल्याचं कळताच पर्यटकांनी सीतेची न्हाणी, वेरुळचा धबधबा पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी केली होती.


काही दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस आता पुन्हा सक्रीय झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये डोंगरदऱ्यातील झरे, ओढे, आणि लहानसहान धबधबे वाहू लागले आहेत. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आपल्या कुटुंबासह, प्रियजनांसह खुलताबाद, दौलताबाद , वेरूळ, म्हैसमाळ आणि जवळपासच्या टेकड्यांवर पर्यटक गर्दी करू लागले आहेत.


पोलिसांचा बंदोबस्त


मागील काही दिवसांपासून धबधब्याशेजारी हुल्लडबाजी करणाऱ्यांपासून कठड्यावर चढून खाली वाकणाऱ्यांचं तसेच सेल्फी, रिल्सच्या नादात दरीत पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असल्याने वेरुळचा धबधबा पाहण्याासाठी कठड्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त असल्याचं दिसून आले. कठड्यापाशी दोन पोलीस, मागे दोन तीन पोलिसांची हजेरी असल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी नव्हती. 


वेरुळचा धबधबा कोसळू लागला


वेरुळचा धबधबा कोसळू लागल्याने अनेकांना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्याचा मोह आवरेनासा झालाय. अनेकांनी शनिवार रविवार अशा सुट्टीचा दिवस गाठून वेरूळच्या खळाखत्या धबधब्याला पाहण्याचा आनंद लुटलाय. परिसरात ओलसर गारवा असून कुटुंबासोबत अनेकांची पावलं आज वेरुळ लेण्यांकडे वळली होती.


वाहतूकीची कोंडी, भाविकांची तारांबळ


श्रावण महिना सुरु असल्याने खुलताबादच्या भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. पण पावसामुळे भाविकांची मोठी तारांबळ पहायला मिळत असून घृष्णेश्वराच्या दर्शनासाठीही मोठी गर्दी दिसून येत आहे. भाविक मंदिराच्या रांगेत थांबले असून श्रावण महिना त्यात शनिवार रविवार! त्यामुळे पर्यटकांसह, भाविकांची गर्दी असल्यानं खुलताबादच्या घाटात वाहतूकीची कोंडी होत असल्याचेही चित्र आहे.