सांगली: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि कोरेगाव-भीमाच्या दंगलीत सहभाग असल्याचा आरोप असलेल्या संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषद घेतली.

बंददरम्यान किंवा दंगल काळात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार का करतंय? ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले त्यांच्याकडून ही भरपाई घ्यावी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.

शिवाय राजकीय स्वार्थ आणि मतासाठी या दंगलीचा वापर केला जातोय, असं भिडे म्हणाले.

दंगलीमागे एल्गार परिषद

पुण्यातील शनिवारवाड्यासमोर झालेल्या एल्गार परिषद ही भीमा-कोरेगाव दंगलीस कारणीभूत आहे. गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी जी कोळसेपाटील आणि प्रकाश आंबेडकर यांची वक्तव्य दंगलीसाठी कारणीभूत आहेत. आधी त्यांना अटक करायला हवी, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली.

प्रकाश आंबेडकरांमुळे महाराष्ट्र पेटला

दंगलीला कारणीभूत  खरे कोण आहेत?  वडूला मी 4-5 वर्षात फिरकलो नाही. राजकीय स्वार्थ आणि मतासाठी या दंगलीचा वापर केला जातोय. प्रकाश आंबडेकर यांनी वयाला शोभेल असे वक्तव्य करायला पाहिजे. प्रकाश आंबडेकर यांनी विधान केल्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला.

मोर्चाला परवानगी नको

मला अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी आणि विधानसभेला घेराव घालण्याचं वक्तव्य म्हणजे नुसता खुळचटपणा आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर

याशिवाय भीमा-कोरेगाव घटनेला 2 महिने झाले तरी यावर सरकारने निवेदन का केले नाही. या प्रकरणात माझी व्यक्तीशा बदनामी झाली. मला बदनाम करणाऱ्यांबद्दल काही तक्रार नाही.  या प्रकरणात सरकार बोटचेपे धोरण घेतय की नाही हे मला सांगता येणार नाही, असं संभाजी भिडे म्हणाले.

चौकशीसाठी मोर्चा काढणार

दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करावी, या मागणीसाठी 28 मार्चला जिल्हा पातळीवर मोर्चा काढू असा इशारा भिडे यांनी दिला.

शनिवार वाड्यावर एल्गार परिषद

कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता. यात एका तरुणाचाही मृत्यू झाला होता. तर स्थानिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा विद्यार्थी नेता उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पण या हिंसाचाराप्रकरणी आता एल्गार परिषदेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला आहे. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.



संबंधित बातम्या

संभाजी भिडेंना 26 मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा : आंबेडकर


“भीमा कोरेगाव हिंसेनंतर ‘बंद’ची हाक देणाऱ्यांकडून भरपाई वसूल करा”


मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल : प्रकाश आंबेडकर