बेळगाव : हेरे (ता. चंदगड) येथे टस्कर हत्तीच्या कळपाने आज सायंकाळी साडेपाच वाजता शेतकरी संजय पेडणेकर यांच्या भिमहोळ नावाच्या शेतात धुडगूस घातला. यात त्यांच्या ऊस, भात व नाचनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हत्तीच्या कळपाने पेडणेकर यांच्या शेतातील तीन एकरातील ऊसामध्ये धुडघूस घातल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेडणेकर यांच्या मुलाने ओरडून हत्ती आल्याचे सांगितल्याने वडील व मुलगी कृष्णल वेळीच ऊसातून बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला.


हेरे येथील पेडणेकर कुटुंबीय आपल्या भिमहोळ नावाच्या शेताकडे गेले होते. स्वत: संजय पेडणेकर, त्याचा मुलगा सुमीत व मुलगी कृष्णल हे तिघेजण होते. पाचच्या दरम्यान संजय हे पेंडी कापण्यासाठी ऊसामध्ये गेले. त्याच्यासोबत त्याची मुलगीही होती. त्याचा मुलगा मात्र शेतातील घरासमोर बांधलेल्या गायीच्या बाजुला उभा होता. साडेपाचच्या दरम्यान एक टस्कर हत्ती, एक मादी व त्याची दोन पिले असे चार हत्ती येताना पेडणेकर यांच्या मुलाला दिसले. त्याने आरडाओरडा केला. मात्र, ऊसातील पेंडी कापताना पेडणेकर यांना काहीच ऎकु आले नाही. मुलगा घाबरुन वडील असलेल्या ऊसामध्ये शिरला व मोठ-मोठ्याने वडिलांना हाका मारु लागला. ही हाक ऎकुन वडील संजय हे ऊसातून बाहेर आले. मुलाने हत्ती आल्याचे सांगितल्यानंतर ते ही घाबरले. तोपर्यंत हत्तींनी त्यांच्या नाचनी पिकांत धुडघुस घातला होता.


यावेळी टस्कराने आपला मोर्चा बांधलेल्या गायीकडे वळविला. गायीवर हल्ला करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाने दिलेली कुत्र्यांच्या आवाजाची ऑडीओ कॅसेट लावली. त्यामुळे हत्ती गोंधळले काही वेळानंतर टस्कराने आपला मोर्चा अन्यत्र वळवला. टस्कर लांब असल्याचे पाहून संजय यांनी गाईला सोडून दिले. त्यामुळे गाय आपला जीव घेवून पळत सुटली. संजय यांच्या मुलाने जर त्यांना हत्ती आल्याचे सांगितले नसते तर कदाचित हत्तींनी ऊसामध्ये असलेल्या संजय व त्यांच्या मुलीवर हल्ला केला असता. त्यामुळे मुलाच्या प्रसंगावधानाने मोठ्या अनर्थ टळला.


हेरे परिसरातील गुडवळे, खामदळे व पारगड रोडच्या आजू-बाजुच्या परिसरात हत्तींचा मुक्त संचार आहे. त्यामुळे या परिसरात वनविभागाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सद्या सुगीचा हंगाम सुरु असल्याने दिवसभर लोकं शेतामध्ये असतात. त्यामुळे दिवसा व रात्री वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून हत्तीच्या रोजच्या ठिकाणाबाबत संबंधित गावातील लोकांना माहीती देणे गरजेचे आहे. नुकसानीचे तत्काळ पंनचामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.