तब्बल 69 वर्षांनी भटवाडीत उजळला लाइटचा प्रकाश
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 11:30 AM (IST)
कोल्हापूर : कोल्हापूर-सिंधुदूर्गच्या मध्यभागी वसलेलं आणि कोल्हापूरपासून 110 किलो मिटरवरचं 820 लोकसंख्या असणारं भटवाडी हे गांव आहे. मात्र, सुस्त प्रशासन आणि राज्याकर्त्यांच्या दुर्लक्षामुळं मुलभूत सुविधांपासून गेली अनेक वर्षांपासून या गावचे ग्रामस्थ आजही वंचित आहेत. दिवसभर काबाडकष्ट करून रात्री सातनंतर घरातील दारं बंद करुन अंधाऱ्या रात्री सकाळची वाट पाहाण्यात येथील तीन पिढ्या संपल्या. या गावात लाईट नसल्यानं रात्री शेतात घुसुन नासदूस करणाऱ्या गव्यांची आणि इतर जनावरांची भिती वाटते. तसेच रात्री आपतकालीन परिस्थितीतही त्यांना सकाळची वाट पाहत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. गारगोटी – भुदरगडचे शिवसेनेचे अमदार प्रकाश अबीटकर यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या परिसराचा दौरा केला. या गावात लाईट नसल्याचं समजताच, त्यांनी त्या वेळी या गावकऱ्यांसाठी मशाल मोर्चाकाढून पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. आता त्यांच्या पाठपुराव्यामुळे स्वातंत्राप्राप्तीच्या तब्बल 69 वर्षांनी या गावात प्रथमच लाईट आली. काल रात्री गावातील मंदिरात अंधाऱ्या रात्री लाईटचं बटन दाबून गावकऱ्यांच्या साक्षीनं हे गाव प्रकाशमय करण्यात आलं.