मुंबई : काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण शिवसेनेसाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत, असं म्हणत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी भाजपवर नाव न घेता निशाणा साधला आहे. अंबरनाथमध्ये झालेल्या शूटिंग रेंजच्या उद्घाटनावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.
अंबरनाथ शहरात ऑलिम्पिक दर्जाचं शूटिंग रेंज उभारण्यात आलं आहे. या शूटिंग रेंजचं उद्घाटन काल युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी शिवसेनेनं 'आता निशाणा साधायचाच' अशी बॅनरबाजी करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत आदित्य ठाकरेंना विचारलं असता, 'काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, मात्र शिवसेनेसाठी नेहमीच लोकांची कामं आणि सुविधा महत्त्वाच्या आहेत', असं म्हणत त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
यावेळी भारताच्या प्रसिद्ध नेमबाज अंजली भागवत, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. शूटिंग रेंजचं उद्घाटन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनाही रायफल आणि पिस्टल हाती घेऊन निशाणा साधण्याचा मोह आवरला नाही.