अकोला : निवडणुक विभागाच्या पथकानं अकोल्यात 54 लाखांची संशयित रोकड पकडली आहे. दोन कारवायांमध्ये ही रक्कम ताब्यात घेण्यात आली. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास वाशिम बायपास आणि हिंगणा फाटा या भागात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई निवडणुक विभागाने केली असून पोलिस पुढील तपास करतायत.

हिंगणा फाटा येथे केलेल्या कारवाईत 52 लाखांची रक्कम ताब्यात घेण्यात आली. एका चारचाकी वाहनातून ही रक्कम जप्त केली आहे. ही रोख रक्कम एचडीएफसी बँकेतून धनादेशद्वारे काढण्यात आल्याचे समजते. तर वाशिम बायपास येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत बेहिशेबी अडीच लाखांची रक्कम जप्त करण्यात आली. ही रोख सुरेंद्र चौथराम केसवानी यांची असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

हिंगणा फाटा जप्त केलेल्या रकमेवर मालकी सांगण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील व्यापारी, एक व्यक्ती, कार चालक आणि एक व्यक्ती जुने शहर पोलिस स्टेशनला आले होते. यासंदर्भात जूने शहर पोलीस संबंधित व्यक्ती आणि बँकेची चौकशी करत आहेतत. सध्या ही सर्व रक्कम कोषागार मध्ये जमा करण्यात येणार आहे. निवडणुकीत या पैशांचा उपयोग करण्यात येणार होता का?, याचा तपास पोलीस करत आहेत.