मुंबई: राज्यात महायुती सरकारमध्ये मंत्रीपदानंतर आता पालकमंत्री पदावरून (Guardian Ministers) पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद (Guardian Ministers) न मिळाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक आणि रायगडचं पालकमंत्री पदाच्या (Guardian Ministers) नियुक्तीला स्थगिती दिली आहे, त्यानंतर नेत्यांनी याबबात अनेक प्रकारे भाष्य केलं आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यात मंत्री भरत गोगावले आणि नाशिक जिल्ह्यात दादा भुसे अनेक वर्षे काम करीत आहेत. त्यांनी पालकमंत्रिपदासाठी (Guardian Ministers) दावा केला असेल, त्यात गैर काय आहे, असा सवाल करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांची पाठराखण केली, त्यानंतर आता भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बाजू घेत आपल्या पक्षाच्या आमदारासाठी काही इच्छा व्यक्त करणे गैर नाही, असं म्हटलं आहे.


पालक मंत्रीपदावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एखादी इच्छा व्यक्त करणे म्हणजे नाराजी आहे, असे म्हणणे योग्य नाही. महायुतीचा महत्त्वाचा भाग एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या आमदारासाठी काही इच्छा व्यक्त करणे गैर नाही. मुख्यमंत्री सध्या दावोस गेले आहेत, ते परत आल्यावर सगळे नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 


पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया


'बीडची मुलगी असल्याने बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले असते तर जास्त आनंद झाला असता', अशी भावना व्यक्त करीत पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी नाराजीचा सूर आळवला आहे, पालकमंत्रिपदावरून महायुतीत सध्या चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यातच मुंडे यांच्या बोलण्यात बीडचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटला, त्यावरती बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बीडचा स्पीड पकडण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल. त्यामुळे गैर किंवा नाराज आहे, असे कपोलकल्पित चित्र तयार करणे योग्य नाही.


गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री?


राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्रिपदाबाबत स्वतः बोलणार आहेत, अशी माहिती आहे.