MNS on Eknath Shinde: महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पेटला असतानाच आणि मुंबईमध्ये गुजरात्यांची मराठी माणसांवर दमदाटी वाढली असतानाच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर थेट गुजराती जयजयकार केल्याने महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेना ठाकरे गटाकडून सातत्याने प्रहार होत असताना आज आम्ही शाहांच्या यांच्या उपस्थितीत झालेल्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी थेट जय गुजरातचा नारा दिला. यानंतर आता मनसे, शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून प्रहार केला आहे.
महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलंच
किल्लेदार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, गुजराती तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलंच! पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या भाषणात शिंदे म्हणाले जय गुजरात! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करत म्हटले आहे की, अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले! पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर “जय गुजरात “ ची गर्जना केली! काय करायचे? ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या ट्विटमध्ये टॅग केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याने वादंग मागण्याची चिन्हे आहेत.
मराठीचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी दारूगोळा दिला?
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये हिंदी विरुद्ध मराठी वाद पेटला आहे. हिंदी सक्तीविरुद्ध महाराष्ट्रामध्ये उद्या दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने विजयी मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलं असताना एकनाथ शिंदे यांनी आजच ठाकरे बंधूंना मराठीचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी दारूगोळा दिला आहे का?असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या