Eknath Shinde on Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम हे मध्यंतरी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढंच काय तर रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा देखील रंगलेल्या. मात्र पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही, जिवंत असेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नसल्याचे रामदास कदम यांनी केले होते. असं असलं तरी ते पक्षकार्यात सक्रिय दिसत नव्हते. मात्र ते आता पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची चिन्हं दिसत आहेत. रामदास कदम यांनी लिहलेल्या 'जागर कदम वंशाचा' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन आज झालं. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी उपस्थिती लावली. 


पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने या सर्वांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचे कौतुक केलं. खासकरून एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांनी निवृत्तीचा विचार करू नये आपण दुसरी इनिंग सुरु करा आपण तुमच्या मागे राहू असा सल्ला देत शिवसेना नेते रामदास कदम यांची पाठराखण केली आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे फायर ब्रॅंड म्हणून रामदास कदम यांचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम कुणापुढे झुकणारे नाहीत, अशी आठवण करून दिली. 


आपल्याला निवृत्त होता येणार नाही असं सांगत नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना सल्ला दिला आहे.  


रामदास कदम यांनी लिहलेल्या पुस्तक हे सरकारी वाचनालयात ठेवलं जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देत रामदास कदम यांनी लिहलेल्या पुस्तकाचे कौतुक केलं. 


वैभव खेडेकर यांचा रामदास कदम यांच्यावर प्रहार


या पुस्तकावरून राजकीय गरमागरमी पहायला मिळतेय. याच पुस्तकावरून खेडचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांच्यावर प्रहार केला आहे. हे पुस्तकाचे नाव जागर नसून गाजर आहे. या पुस्तकात रामदास कदम यांनी लिहलेलं पुस्तक समाजाला कितपत आदर्श हे पाहावं लागेल. राजकीय संन्यासानंतर रामदास कदम यांना भरपूर वेळ मिळाला असावा, त्यांनी टीका वैभव खेडेकर यांनी केली आहे. या पुस्तकात पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण कसं करायचं, कार्यकत्यांना दबावात कसं ठेवायचं, जमिनी कशा गिळंकृत कराव्या हे लिहलं असा टोलाही त्यांनी लगावला.